छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मुकूंदवाडी शिवशाहीनगरात जुन्या वादातून मनपा सफाई कर्मचार्याच्या घरावर गोळीबार करणार्या कुख्यात गुन्हेगारांच्या ५ टोळीतील ७ आरोपींना मंगळवारी (दि.२०) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.
टोळीप्रमुख शुभम भिखूलाल जाट (रा. बीड बायपास), मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव ऊर्फ छोट्या, गोल्या ऊर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पहुळ, सागर राऊत, अमर ऊर्फ अतुल पवार अशी आरोपीची नावे आहेत. पुंडलिकनगर पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम जाटकडून गोळीबार करण्यासाठी वापरलेला गावठी कट्टाही जप्त केला आहे. सचिन लाहोट (३५, रा. शिवशाहीनगर, मुकुंदवाडी) हे सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी झोपलेले असताना बाहेर शुभम जाटची टोळी हातात तलवारी, चाकू, पिस्तूल घेऊन शिवीगाळ करताना दिसले. सचिन बाहर आजा, आज तुझे खतम करना है, असे ओरडत होते. दरवाजा उघडत नसल्याने गोल्या ऊर्फ विजय धनईने मोठा दगड उचलून त्याच्या दारावर टाकला, त्यानंतर शुभम जाटने पिस्तुलातून घराच्या दिशेने गोळी झाडली होती. सचिनची काकी शोभा विनोद लाहोट (जयभवानीनगर) आणि नातेवाईक अजय कागड़ा यांचे आणि शुभम जाटचे जुने भांडण असून, त्यातूनच गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर काही अंतरावर सचिन यांच्या नातेवाइकांच्या घरीही टोळीने राडा केला. पिस्तूल रोखून ट्रिगल दाबले, मात्र पिस्तूल लॉक झाल्याने गोळी फायर झाली नाही. त्यामुळे अनर्थ टळला, त्यानंतर टोळके तेथून पसार झाले होते. प्रकरणाचा अधिक तपास याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस करत आहेत.














